Laxman Hake । लक्ष्मण हाकेंनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; “शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट…”

Laxman Hake । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आजपासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात शांतता रॅलीला सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून आपलं तिकीट फायनल करण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट लक्ष्मण हाके यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. या मतदारसंघातून लक्ष्मण हाके
यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

“दरम्यान, राजकारणात आणि सभागृहात सामाजिक समतोल साधायचा असल्यास प्रतिनिधीत्व एखाद-दुसरं तरी पुढे यायला पाहिजे. पण, त्या प्रतिनिधींना टार्गेट केलं जातं आहे, ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची भावना आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले होते.

हाकेंना पत्रकारांनी तुम्ही उमेदवारी मागायला शरद पवारांकडे गेला होतात का? असा प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी उत्तर दिलं. बोलताना ते म्हणाले की, “होय, निश्चितच मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो, त्यावेळी पवारसाहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही जाहीर केली होती. पण पुन्हा काय झालं त्याचं त्यांनाच माहिती.

मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघात मला 5 हजार मतं पडली. कारण, आपला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी त्या सभागृहात गेला पाहिजे ही भावनाच अजूनही तेथील समाजात नाही. धनगराने कुठं खासदार व्हायचं असतं का, त्याने कुठं तिकीट मागायचं असतं का, गावातल्या तेल्याने, रामोश्याने कुठं लोकसभेचं तिकीट मागायचं असतं का, असे प्रश्न विचारले जातात ही समाजातील फॅक्ट आहे,” असे स्पष्टीकरण लक्ष्मण हाकेंनी दिले. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment