मुंबई : बहुतेक लोकांना पनीरच्या विविध प्रकारच्या भाज्या जास्त पसंत असतात. हॉटेलमध्ये गेलो आणि पनीर भाजी ऑर्डर केली नाही असे शक्यतो होत नाही. लहान मुले काय आणि मोठी माणसे काय.. प्रत्येकालाच स्वादिष्ट पनीर भाजी पसंत असते. यामध्येही अनेक प्रकार आहेत. यातील अनेक भाज्या अशा आहेत की ज्या तुम्ही अगदी घरी सुद्धा तयार करू शकता. कढई पनीर देखील त्या पैकीच एक आहे. आज आम्ही तुम्हाला कढई पनीर कसा तयार करतात याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी हॉटेल स्टाइल स्वादिष्ट पनीर बनवू शकता.
साहित्य – पनीर अर्धा किलो, टोमॅटो 5, सिमला मिरची 3, बारीक केलेले अद्रक 1 चमचा, लसूण 5 पाकळ्या, पनीर मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद 1/2 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, कोथिंबीर 1 चमचा, जिरे 1 चमचा, हिरवी मिरची 2, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार.
रेसिपी
कढई पनीर बनवण्यासाठी प्रथम पनीर घ्या आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. यानंतर सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून एका भांड्यात बाजूला ठेवा. आता एका भांड्यात एक कप पाणी टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात टोमॅटो टाका आणि 4-5 मिनिटे उकळा. यानंतर गॅस बंद करून टोमॅटो काढा आणि साल काढून घ्या. यानंतर टोमॅटो बारीक करुन एका भांड्यात बाजूला ठेवा.
आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. यानंतर त्यात अद्रक आणि बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाका आणि तळून घ्या. साधारण एक मिनिट मंद आचेवर तळून झाल्यावर त्यात टोमॅटो टाकून मसाल्यात मिसळा आणि नंतर दोन मिनिटे शिजू द्या. यामुळे टोमॅटो चांगले विरघळेल. त्यानंतर यामध्ये लाल तिखट, धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून एक मिनिट शिजू द्या. नंतर पॅन झाकून ठेवा आणि आणखी काही वेळ शिजू द्या. काही वेळाने तव्याचे झाकण काढून त्यात सिमला मिरची टाका आणि 2 मिनिटे शिजू द्या, नंतर पनीरचे तुकडे टाकून ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळा. आता भाजी आणखी दोन ते तीन मिनिटे शिजू द्या.
आता पनीरमध्ये गरम मसाला, पनीर मसाला आणि कसुरी मेथी टाका आणि चांगले मिसळून घ्या. दोन ते तीन मिनिटे भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा. आता भाजीमध्ये हिरवी कोथिंबीर टाका आणि थोडा वेळ झाकून ठेवा. अशा प्रकारे तुमची कढाई पनीर टेस्टी भाजी तयार आहे. तंदुरी रोटी, पराठा किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.
तेलात न तळता असा बनवा चविष्ट आणि हेल्दी पनीर आलू समोसा.. ही घ्या सोपी रेसिपी..