दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरमधील पांगरमल दारुकांडात तब्बल 13 जणांचा जीव गेला होता. अशाच घटनेची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली आहे. विषारी दारु प्यायल्याने या राज्यामधील तीन जिल्ह्यांतील 18 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांका जिल्ह्यातीलच 10 जणांचा या घटनेत मृत्यू झालाय. या घटनेमुळे बिहारमध्ये होळीला गालबोट लागलं..
बिहार सरकारने राज्यात दारूबंदी केली असली, तरी त्याचा परिणाम कुठेच दिसत नाही. ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवले जात असले, तरी दारूचा ओघ कायम आहे. उलट दारुबंदी करण्यात आल्यापासून दारुची तस्करी वाढली आहे. शिवाय दारूच्या किंमतीही वाढल्याने अनेक जण गावठी दारू पित असल्याचे सांगण्यात आले..
छुप्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या अशाच गावठी दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, बांकाचे ‘एसपी’ अरविंद कुमार गुप्ता यांनी हा आरोप फेटाळून लावला. ‘विषारी दारुमुळे हे मृत्यू झाल्याचं अजून स्पष्ट झालेले नाही, सध्या सगळंच संशयास्पद आहे, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल,’ असं ते म्हणाले.
भागलपूरच्या नाथनगर भागातील साहेबगंज परिसरात होळीच्या दिवशी अनेक जण दारू प्यायले होते, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. काही वेळाने या लोकांची प्रकृती बिघडली व त्यात अनेकांचा मृत्यू झाला. मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंजमध्ये 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारुमुळेच हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मधेपुरा इथं होळीनिमित्ताने विषारी दारू प्यायल्याने २२ जण आजारी पडले आहेत. या सर्वांना मुरलीगंज पीएचसी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दारूमुळे मृत्यू झाल्याचा पोलिस आणि कुटुंबीयांकडून इन्कार केला जात असला, तरी पोलिसांनी तत्परतेने रात्रीच्या अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला जात आहे.
IPL 2022: IPL वर पुन्हा संकट; राज्य सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय
अन्.. ‘आप’ ने करून दाखवला: पहिल्याच कॅबिनेट बैठकीत घेतला; ‘तो’ मोठा निर्णय