नवी दिल्ली : जगात प्रत्येकाला आकृष्ट करणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे आनंद… मानवच नव्हे, तर जंगली प्राणीही आनंदी, सुखी जीवनासाठी धडपड करीत असतात. अर्थात, कितीही धडपड केली, तरी प्रत्येकालाच आनंदाची, सुखाची प्राप्ती होईलच, याची खात्री नसते. त्यामुळे सुखी, आनंदी जीवनाचे नेमकं रहस्य काय, असा प्रश्न पडतो. मात्र, अनेकदा हे रहस्य माहिती झाले, तरी सगळेच लोक आनंदी होतील, असे नाही..
संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दरवर्षी ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ तयार केला जातो. म्हणजेच, जगातील सर्वात आनंदी देशांची यादी.. या अहवालाचे हे दहावे वर्ष आहे. लोकांचा आनंद, आर्थिक व सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य, त्यांचे स्वास्थ्य, भ्रष्टाचाराची पातळी, एकूण देशांतर्गत उत्पादन, यानुसार अहवालात विश्लेषण केले जाते. नुकताच हा अहवाल समोर आला असून, त्यात जगातील सर्वात आनंदी देश ठरलाय, फिनलँड.. सलग पाचव्यांदा या देशाने आनंदी देशांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवलाय…
भारताचा क्रमांक कितवा?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारतासाठी ही फार काही ‘आनंदा’ची बातमी नाही. कारण, 146 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 136 वा आहे, विशेष म्हणजे, आपला शेजारी पाकिस्तान 121 व्या स्थानावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात सर्वात दु:खी देश ठरलाय अफगाणिस्तान. हा देश आधीपासून तळाशी होता. त्यात तालिबानने तेथील सत्ता काबीज केल्यानंतर तेथे मानवी समस्यांनी उग्र रूप धारण केलंय. अफगाणिस्तान नंतर खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे, लेबानन हा देश…
गेल्या तीन वर्षांतील माहितीच्या आधारे शून्य ते दहा, अशी आनंदाची पातळी मोजली जाते. रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची ही स्थिती आहे. आनंदी देशांच्या यादीत उत्तर युरोपातील देशांनी वरचे स्थान पटकावलेय. त्यात फिनलँड प्रथम, डेन्मार्क दुसऱ्या, तर आइसलँड तिसऱ्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंड आणि नेदरलँड अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेने तीन पायऱ्या वर येत 16 व्या, तर ब्रिटन 17, फ्रान्स 20 व्या स्थानावर आहे.
जगावर कोविडचे संकट येण्यापूर्वी व आल्यानंतर लोकांच्या भावनांचेही विश्लेषण त्यात करण्यात आले आहे. कोविडमुळे 18 देशांमधील लोकांच्या तणावात वाढ झाली. दु:ख वाढले. मात्र, त्याच वेळी राग येण्याचे प्रमाण घटले. लोकांच्या स्वास्थ्यासाठी सामाजिक पाठिंबा, एकमेकांप्रती औदार्याची भावना, सरकारमध्ये प्रामाणिकता हे महत्त्वाचे असल्याचे या अहवालात आढळते, असे मत अहवालाचे सहलेखक जेफ्री साश यांनी म्हटले आहे. जागतिक नेत्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सर्वांत आनंदी देश
- फिनलँड
- डेन्मार्क
- आइसलँड
- स्वित्झर्लंड
- नेदरलँड
- लक्झेंम्बर्ग
- स्वीडन
- नॉर्वे
- इस्राईल
- न्यूझीलंड
सर्वात दु:खी देश
- अफगाणिस्तान
- लेबानन
- झिम्बाब्वे
- रवांडा
- बोतस्वाना
- लेसोथो
- सिएरा लिओन
- टांझानिया
- मलावी
- झांबिया
काम की बात : पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतोय ‘एफडी’ पेक्षा जास्त परतावा; जाणून घ्या, माहिती फायद्याची..
‘गुगल पे’वरुन एका दिवसात किती पैसे पाठवता येतात..? नियम काय सांगतो, वाचा सविस्तर..