दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस देशाच्या राजकारणात कमजोर ठरताना दिसत आहे. राज्यांमध्ये आता प्रादेशिक पक्षांचे सामर्थ्य वाढले आहे आणि हे पक्ष आता काँग्रेसलाही आव्हान देत आहेत. भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत आता काँग्रेस पक्ष राहिलेला नाही, अशी टीका विरोधी पक्षांचे नेते सातत्याने करत असतात. आताही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी या मुद्द्यावर काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, की काँग्रेस भाजपला आव्हान देण्याच्या स्थितीत नाही. भाजपला आता काँग्रेसचा मोठा धोका दिसत नाही.
येचुरी पुढे म्हणाले, की काँग्रेस आज कमकुवत आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील अनेकांना काँग्रेस मोठा धोका वाटत नाही, कारण काँग्रेसचा कोणताही नेता पक्ष सोडून कधीही भाजपमध्ये येऊ शकतो. त्यामुळे कमकुवत काँग्रेस हे आव्हान पेलण्यास असमर्थ आहे. विरोधी आघाडीबद्दल येचुरी म्हणाले की, मजबूत डावे पक्ष सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणण्यास सक्षम असतील. केरळमध्ये अनेक प्रसंगी काँग्रेसने भाजपबरोबर एलडीएफ सरकारच्या विरोधात काम केले आहे. अशा तडजोड वृत्तीला मदत केली जाऊ शकत नाही. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी राज्यांमध्ये विश्लेषण आणि आघाडी हा एक प्रभावी उपाय ठरेल, असे ते म्हणाले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजप बॅकफूटवर असल्याचेही येचुरी म्हणाले. ‘भाजप या निवडणुकीत बॅकफूटवर राहिला. विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सलग तीन वेळा त्यांच्या मतदारसंघाला भेट दिल्याचे आपण कधीही ऐकले नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरही टीका केली.
दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील मतदान पार पडले आहे. मणिपूर राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्च रोजी होणार आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
Election 2022 : पहिल्या टप्प्यात जबरदस्त मतदान.. निवडणूक आयोगाने दिलीय महत्वाची माहिती