नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लिगचा (IPL 2022) पंधरावा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे.. त्यादृष्टीने सगळे संघ आपल्या तयारीला लागलेले असताना, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या आयपीएलमधील नव्या संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलीय. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना बायो बबलमध्ये बराच काळ राहावे लागणार आहे.. त्यासाठी जेसन रॉयची तयारी नसल्याने त्याने ‘आयपीएल’मधून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या आठवड्यातच रॉयने याबाबतची माहिती ‘अहमदाबाद फ्रेंचायजी’ला दिली होती. गुजरात टायटन्सने ‘आयपीएल 2022 ऑक्शन’मध्ये तब्बल दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसमध्ये रॉयला आपल्या संघात सामील केलं होतं.. धडाकेबाज सलामीवीर म्हणून जेसन राॅय ओळखला जातो.. मात्र, आता त्याने अचानक स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याची जागा आता कोण घेणार, असा प्रश्न गुजरात टायटन्ससमोर उपस्थित झाला आहे. ‘आयपीएल’मधून माघार घेण्याची जेसन रॉयची ही दुसरी वेळ आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सने त्याला दीड कोटीमध्ये विकत घेतलं होतं, पण व्यक्तीगत कारणामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.
सलामीसाठी आता कोण?
गुजरात टायटन्ससमोर सलामीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीयत. शुभमन गिल याच्यासोबत आता त्यांना नवीन ओपनर शोधावा लागणार आहे. जेसन रॉयसाठी ‘गुजरात टायटन्स’ हा आयपीएलमधला चौथा संघ होता. याआधी तो 2017 मध्ये गुजरात लॉयन्स, 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि 2021 मध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी खेळला आहे. ‘आयपीएल 2021’मध्ये जेसनला कोणीही विकत घेतलं नव्हते. मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी जेसन रॉयचा समावेश करण्यात आला. जेसन रॉयने आयपीएलमध्ये 13 सामन्यात 29.90 च्या सरासरीने 329 धावा केल्या आहेत. 129.01 चा स्ट्राइक रेट होता. जेसन रॉयच्या नावावर दोन अर्धशतक आहेत. दिल्ली आणि हैदराबादसाठी त्याने ही कामगिरी केलीय.
‘पीएसएल’मध्ये दमदार खेळ
जेसन राॅयने पाकिस्तान सुपर लीगमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. या स्पर्धेत ‘क्वेट्टा ग्लॅडिएटर्स’ संघाकडून 6 सामने खेळला होता. त्यात त्याने 50.50 च्या सरासरीने 303 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 170.22 होता.
धन की बात..! ‘एलआयसी आयपीओ’मध्ये सूट हवीय, मग लगेच करा हे काम..!
IND vs SL: श्रेयस अय्यरने रवींद्र जडेजाबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…