नवी दिल्ली : रशिया व युक्रेनमधील सुरु असलेल्या युद्धामुळे सारे जगच चिंतेत पडले आहे. रशियाने हे युद्ध बंद करावे, यासाठी जगभरातील देशांमधून रशियावर दबाव वाढला आहे. याबाबत भारतानेही चिंता व्यक्त केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर तब्बल 25 मिनिटे चर्चा केली. युक्रेनसोबतचा तणाव संवादाने सोडवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबतही पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनसंदर्भातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. त्याच वेळी रशिया आणि नाटो गटांमधील मतभेद प्रामाणिक संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला. हिंसाचार ताबडतोब थांबवण्याचे आवाहन करीत पंतप्रधान मोदी यांनी राजनैतिक संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केलं..
मोदी व पुतीन यांच्यात जवळपास 25 मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक राहिली. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असे नमूद करतानाच युक्रेनमधील हिंसाचार तात्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे आवाहन मोदी यांनी केले.. रशियाचा नाटो देशांशी वाद असला, तरी त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले.
युक्रेनमध्ये भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांना तिथून सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान आहे. यावर मोदी यांनी पुतीन यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्याला पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुतीन यांनी एकंदर स्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केले. तसेच ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यावर पुढे अधिक विचारमंथन करण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. भारत आणि रशिया या दोन देशांत मैत्रीचे संबंध राहिले आहेत. त्या आधारावर दोन्ही नेत्यांमधील चर्चा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात आले..
Corona Update : WHO ने कोरोनाबाबत दिलीय महत्वाची माहिती.. लसीकरणाबाबत केलेय ‘हे’ विधान..
Russia-Ukraine War : आम्ही युद्धात एकटे पडलो.. रशियाला माफ करणार नाही.. कोणी दिलाय इशारा