मुंबई : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ले केल्यानंतर गुरुवारी (ता. 24) जगभरातील भांडवली बाजारांवर त्याचे विपरित परिणाम दिसले. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले असले, तरी रशियाकडून हल्ले सुरुच आहेत. भारतीय शेअर बाजाराला या युद्धाचा काल सर्वात मोठा फटका बसला.. सेन्सेक्स तब्बल 2700 अंकांनी, तर निफ्टी 800 अंकांनी कोसळला होता.
एका झटक्यात गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे आजचा दिवस कसा असेल, याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले होते.. मात्र, आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. अमेरिकेसह आशियातील भांडवली बाजार सावरल्यानंतर आज (शुक्रवारी) भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळाली.. सेन्सेक्सने 1000 अंकाची झेप घेतली, तर निफ्टीतही 300 अंकाची वाढ झाली. गुंतवणुकदारांची किमान 3 लाख कोटींची भरपाई झाली..
आज सकाळी बाजार सुरु होताच चौफेर खरेदीचा ओघ दिसला. बँका, वित्त संस्था, ऑटो, आयटी सेवा या क्षेत्रात खरेदी दिसून आली. सकाळी 9.20 मिनिटांनी सेन्सेक्स 1066 अंकांनी वधारला असून, तो 55,596 अंकावर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 333 अंकांनी वाढून तो 16,581 अंकावर ट्रेड करीत आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर तेजीत होते. त्यात एसबीआय, रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, इंडस इंड बँक, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक या शेअरमध्ये वाढ झाली. निफ्टीवर देखील सर्वच क्षेत्रात खरेदी सुरु आहे.
रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे घसरलेल्या देशांतर्गत शेअर बाजारने पुन्हा उसळी मारली आहे. रशियावर नवीन प्रतिबंध लावल्यानंतर गुरूवारी अमेरिकेच्या बाजारातही तेजी दिसली. देशांतर्गत बाजाराला ग्लोबल मार्केट ट्रेडकडून आधार मिळत आहे, पण गुंतवणूकदारांवर अजूनही युद्धाचा दबाव कायम राहणार आहे.
Recipe : सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर रोल.. मुलांसह मोठ्यांनाही आवडेल
‘त्यामुळे’ सोने लवकरच गाठणार 60 हजारांचा टप्पा; पहा, कुणी व्यक्त केलाय हा अंदाज..?