.. म्हणून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी केलेय धरणे आंदोलन; विरोधी भाजपही आक्रमक.. पहा, काय सुरू आहे राजकारण..?
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केंद्रीय यंत्रणेच्या या कारवाईच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले आहे. या अटकेच्या निषेधार्थ आज आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी धरणे आंदोलन केले. तर दुसरीकडे या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजप सुद्धा चांगलाच आक्रमक झाला आहे. मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज भाजप कार्यकर्ते सुद्धा जोरदार आंदोलन करत आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी पुकारलेल्या या धरणे आंदोलनात राज्य सरकारमधील अनेक मंत्री सहभागी झाले. या आंदोलनात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी सहभागी झाले होते.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांना गप्प करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. तसेच हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, मलिक यांच्यावरील आरोप निराधार आहेत. मलिक त्यांच्यावरील सर्व आरोपांना न्यायालयात उत्तर देतील, असे ते म्हणाले. राज्यातील सरकार पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. मंत्रिमंडळ सदस्यावरील कारवाई हा त्याचाच एक भाग आहे.
ईडीने बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर मलिक यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी सुनावली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता राज्य सरकारला आणखी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. पत्रकार परिषदा घेऊन भाजप नेते सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तसेच मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. आताही त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप कार्यकर्ते सुद्धा आंदोलन करत आहेत. त्यामुळे हा राजकीय वाद आता आणखी वाढण्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.
नबाव मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, मलिकांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं..?