‘क्रिप्टोकरन्सी’बाबत मोठा खुलासा.. गुंतवणूक करण्याआधी अर्थमंत्री काय म्हणतात वाचा…
नवी दिल्ली : केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी क्रिप्टोकरन्सीवर (Cryptocurrency) 30 टक्के कर आकारणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता दिल्याचेच समजले जात होते.. मात्र, आता याबाबत एक मोठा खुलासा समोर येत आहे. केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर आकारणार असल्याचे सांगितले असले, तरी अद्याप तरी केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता देण्याबाबत कुठलीही ठोस भूमिक घेतलेली नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले आहे…
ते म्हणाले, की “क्रिप्टोकरन्सी कायदेशीर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय उच्च पातळीवरील चर्चेनंतरच घेतला जाईल. सध्या तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. देशात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर नाही नि भविष्यात तिच्या कायदेशीर स्थितीबाबत आता तरी काहीही सांगता येणार नाही..!”
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनीही त्याआधी म्हटले होते, की क्रिप्टोवर कर आकारणी केली असली, तरी त्यावरुन सरकार येत्या काळात क्रिप्टोला मान्यता देणार असल्याचा अंदाज लावू नये. त्याबाबत कराड यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, भारतात क्रिप्टोकरन्सीला रिझर्व्ह बँक (RBI) किंवा सरकारने कोणतीही मान्यता दिलेली नाही. देशात सध्या क्रिप्टोकरन्सी कायदेशीर नाही. या अर्थसंकल्पात सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर कर आणि व्यवहारांवर टीडीएस लावण्याची घोषणा केली, परंतु त्यातून त्याला कायदेशीर कवच प्राप्त होत नाही.
भविष्यात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर होईल की नाही, हे आता सांगू शकत नाही. सरकारच्या उच्च पातळीवरील चर्चेनंतरच त्याचा निर्णय घेण्यात येईल. काही लोकांनी खासगी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून मिळणाऱ्या नफ्यावर 30 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मांडला असल्याचे कराड म्हणाले..
‘त्या’ प्रकरणावर जोस बटलर म्हणतो नो प्रॉब्लेम.., सोशल मीडियावर होत आहे जोराने चर्चा
‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची बातमी, पाॅलिसीधारकांचीही होणार चांदी..!