दिल्ली : निवडणूक आयोगाने शनिवारी कोविड-19 मुळे 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर घातलेले निर्बंध आणखी शिथिल केले, मर्यादित लोकांसह पदयात्रेला परवानगी दिली आणि प्रचारावरील बंदीचा कालावधीही कमी केला. निवडणूक आयोगाने आता राजकीय पक्षांना मर्यादित लोकांसह पदयात्रेचा प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. याबरोबरच निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ 4 तासांनी वाढ केली आहे. आता राजकीय पक्षांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. याआधी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत प्रचाराची परवानगी होती.
8 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी मतदानाचे वेळापत्रक जाहीर करताना, कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे थेट रॅली, रोड शो आणि पदयात्रा यांवर बंदी घातली होती. आयोग वेळोवेळी साथीच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि काही शिथिलता देत आहे.
दरम्यान, या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदानाने सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 55 जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी, तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, चौथ्या टप्प्यात 60, पाचव्या टप्प्यात 60 जागांवर, सहाव्या टप्प्यात 57 आणि सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 14 फेब्रुवारीला दुसरा टप्पा, 20 फेब्रुवारीला तिसरा टप्पा, 23 फेब्रुवारीला चौथा टप्पा, 27 फेब्रुवारीला पाचवा टप्पा, 3 मार्चला सहावा टप्पा आणि 7 मार्चला सातवा टप्प्यातील मतदान होणार आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या राज्यात एकाच टप्प्यात तर मणिपूर राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.