मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी (Hinganghat case) अखेर हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, या घटेनेतील मृत प्रा. अंकिता पिसुड्डे हिची आजच (ता. 10) दुसरी पुण्यतिथी आहे. त्याच दिवशी हा निकाल आल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
नेमकं काय घडलं होतं..?
हिंगणघाटच्या (स्व.) आशा कुणावार महिला महाविद्यालयात प्रा. अंकिता पिसुड्डे वनस्पतीशास्त्र विषयाची अर्ध वेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. प्रा. अंकिता व आरोपी विकेश नगराळे हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.. त्याचे अंकितावर एकतर्फी प्रेम होते. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित प्रा. अंकिता 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी घरातून बसने हिंगणघाट येथे पोहचली.
नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना दबा धरुन बसलेला आरोपी विकेश नगराळे अचानक तिच्यासमोर आला. बाटलीत आणलेले पेट्रोल त्याने अंकिता हिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला.. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या अंकिताला नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी तिने जगाचा निरोप घेतला.
या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आरोपी विकेशला घटनेच्या दिवशीच 3 फेब्रुवारीला अटक करण्यात आली.. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोपपत्र पूर्ण केले. आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयानेही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवले. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात आली.
हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) अंकिता हिच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्कीला दोषी ठरवले होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अॅड. उज्वल निकम म्हणाले, की आज 10 फेब्रुवारीला हिंगणघाट पीडितेच्या निधनाला दोन वर्षे झाली. आरोपी विकेश नगराळे याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीतर्फे सांगण्यात आले, की त्याचे लग्न झाले असून, त्याला दया दाखवावी. याउलट आरोपीला कठोर शासन खुनाच्या आरोपात जे दिलं जाऊ शकतं, त्यात आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी आम्ही न्यायालयाकडे केली. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली..
काम की बात : स्मार्टफोनचा कमी स्पीड ठरतोय त्रासदायक..? ; मग, ‘या’ महत्वाच्या टिप्स फॉलो करा..
यंदा खताची काळजी नको..! मोदी सरकारने काय निर्णय घेतलाय, वाचा..!