औरंगाबाद : ‘आम्ही सत्तेत आलो, तर काळा पैसा बाहेर काढू, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील..,’ असे आश्वासन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सांगितले जाते.. त्यावरुन विरोधक सातत्याने मोदी सरकारवर टीका करीत असतात. मात्र, औरंगाबादमधील एका पठ्ठ्याच्या खात्यावर 4 महिन्यांपूर्वी खरंच 15 लाख रुपये जमा झाले.. मग काय, गड्यानं मागचा पुढचा विचार न करता, त्या पैशांतून आपल्या स्वप्नातील बंगला बांधला. बरं एवढ्यावरच तो थांबला नाही, तर पंतप्रधानांनी आश्वासन पाळलं, म्हणून पठ्ठ्याने चक्क पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल पाठवून आभारही व्यक्त केले. त्यानंतर पुढे जे घडलं, ते आणखीच आश्चर्यकारक आहे.
औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातील एका शेतकऱ्याने बँक ऑफ बडोदामध्ये जनधन खाते उघडलेले आहे. या शेतकऱ्याच्या खात्यात 17 ऑगस्ट 2021 रोजी चक्क 15 लाख 34 हजार 624 रुपये जमा झाले. खात्यात इतके पैसे कसे आले, यावर गावात चर्चा सुरु झाली. अखेर पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन पाळले, त्यांनीच हे पैसे खात्यावर पाठविल्याचे मानून या शेतकऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
शेतकऱ्याने लगेच खात्यातून 9 लाख रुपये काढले नि चार महिन्यांतच चांगला दणदणीत बंगला बांधला.. वर पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला ई-मेलही पाठवला.. त्यानंतर जे समोर आले, ते पाहून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हे पैसे होते ग्रामपंचायतीचे. 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळणारे पैसे बँकेच्या चुकीने शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले. तब्बल 4 महिन्यानंतर ही चूक लक्षात आली. बँक खाते क्रमांकात केवळ एका नंबरच्या चुकीने हा सगळा घोळ झाला.
आता या शेतकऱ्याने हे पैसे परत करावे, असे पत्र बॅंकेने त्याला पाठविले आहे. बँक ऑफ बडोदाकडून पत्र आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. पण आता ही रक्कम परत कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.. खात्यावर एवढी मोठी रक्कम जमा झाल्यावर शेतकऱ्याने बँक किंवा पोलिसांना कळवणे आवश्यक होते. आता त्याने ही रक्कम परत न केल्यास आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामसेवकाने दिला आहे. शेतकऱ्याने 9 लाख रुपये वापरले असून, उर्वरीत 6 लाख रुपये आणि त्याआधी खर्च केलेली रक्कम हप्त्या-हप्त्याने परत करू, असे आश्वासन शेतकऱ्याने दिले आहे..
Johnson Baby Powder : म्हणून बेबी पावडरवर बंदी..! पहा नेमकी काय चर्चा चालू आहे जगभरात
Propose Day 2022 : नाहीतर होईल बट्ट्याबोळ..! प्रपोज करताना अशी घ्या काळजी