‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहनानंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर, नागपुरात आंदोलनाला हिंसक वळण..
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, तर ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. नागपूर, उस्मानाबाद, मुंबई, औरंगाबादसह विविध शहरांत विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. ‘युट्यूबर हिंदुस्थानी भाऊ’ याच्या आवाहनानंतर हे विद्यार्थी ठिकठिकाणी जमल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
नागपूरसह काही भागात या विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. नागपूरमध्ये स्कूलबसवर काही विद्यार्थ्यांनी विटा फेकल्या. त्यात बसचे मोठे नुकसान झाले आहे.. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांना पांगविण्यासाठी अखेर पोलिस बळाचा वापर करावा लागला.
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाचा धोका पाहता, बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी नागपुरातील ट्रिलीयम मॉल मेडिकल चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होऊ शकतात, तर मग दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षासुद्धा ऑनलाईन व्हायला हव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या जिवाला हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुर्नविचार करावा, अशी विनंती विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे केली आहे..
धारावी येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. त्यावर मंत्री गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. शाळेतील मुलं दोन आघाड्यावर लढत आहेत, एकीकडे कोरोनाची परिस्थिती, तर दुसरीकडे दोन वर्षांपासून शिक्षणात निर्माण झालेली पोकळी.. असं असताना आता मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल, तर ती राज्य सरकारला करावी, असं आवाहन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केलं आहे.
‘हिंदुस्थानी भाऊ’चा पोलिसांकडून शोध
‘हिंदुस्थानी भाऊ’ याच्या आवाहनानुसार, हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे सांगण्यात येते.. त्यामुळे या आंदोलनामागे असणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास पाठक याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.. विद्यार्थांची डोकी भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Election 2022 : निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय; कोरोनाचा धोका पाहता ‘त्या’ प्रचाराला परवानगी नाहीच..
महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी..! ठाकरे सरकारने कामाबाबत घेतला मोठा निर्णय..