पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अडचणी वाढल्या आहेत. येथे काही ठिकाणी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत, अनेक जणांना तिकीट नाकारले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या काही जणांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. ज्याचा त्रास भाजपला आगामी निवडणुकीत होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारले आहे. पणजी मतदारसंघातून पक्षाने अटान्सियो मोन्सेराते यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आता भाजपला धक्का देणारा निर्णय घेत तो प्रत्यक्षातही आणला आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी भाजपने केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
पर्रीकर यांनी आज पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्पल पर्रीकर यांच्यासह भाजपवर नाराज होऊन पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मांद्रे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता भाजपसाठी आणखी एक धक्का देणारी बातमी आहे. भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उत्पल पर्रीकर यांना समर्थन दिले आहे. या घडामोडी भाजपसाठी चांगल्याच त्रासदायक ठरणार आहेत.
पर्रीकर आता या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसनेही या मतदारसंघातून एल्वीस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचा मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे खरी लढत मोन्सेराते आणि पर्रीकर यांच्यातच होणार आहे. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने पर्रीकर अपक्ष म्हणून निवडणुकीत आहेत. त्यामुळे भाजप मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फटका मोन्सेराते यांना बसू शकतो. या निवडणुकीत विजयी कोण होणार, हे आताच सांगता येणे मात्र कठीण आहे.
या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर तिकीट मागत होते. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारले आहे. त्यानंतर पर्रीकर यांना अन्य राजकीय पक्षांनी ऑफर दिल्या होत्या, तसचे भाजपनेही अन्य दोन मतदारसंघाचे पर्याय त्यांच्या समोर ठेवले होते. मात्र, पर्रीकर यांनी या सगळ्यांनाच नकार देत अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक आता भाजपसाठी आधिक आव्हानात्मक ठरणार आहे.
दरम्यान, आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो, तरी देखील भाजपने उमेदवारी दिली नाही. याचे वाईट वाटते, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. पार्सेकर हे सुद्धा मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तसेच पक्षाचाही राजीनामा देणार आहेत. दीपक पाऊसकर यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे ते सुद्धा भाजपवर कमालीचे नाराज झाले आहेत. आणखीही काही जणांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.