नगरपंचायत निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय प्रतिक्रिया; पहा, नेमके काय म्हटलेय ?
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. या निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते विजयाचे दावे करत आहेत. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्याचे दिसत आहे. असे असताना भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या निकालानंतर फडणवीस यांनी ट्विट करत मतदारांचेही आभार मानले आहेत.
‘मविआ सरकारकडून धनशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपा 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्य संख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असे ट्वीट करत फडणवीस यांनी भाजप हाच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.
‘कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मा. मोदीजींचे नेतृत्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे,’ असेही फडणवीस यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आतापर्यंत 106 पैकी 96 नगरपंचायतींचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 26, भाजप 25, काँग्रेस 21 शिवसेना 17 आणि अन्य पक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत.