गोव्यात काँग्रेस बरोबर आघाडी होणार का..? ; राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टच सांगितले; जाणून घ्या..
मुंबई : देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. गोव्यात काँग्रेस बरोबर आघाडीबाबत अद्याप काही स्पष्ट नाही. काँग्रेसकडूनही काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते पक्षाचे पुढील धोरण काय असेल, याबाबत संकेत देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गोव्यात 15 आमदार पक्ष सोडून गेले आहेत. तरी सुद्धा काँग्रेसला अजूनही ते स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात, असे वाटत आहे. काँग्रेसने आम्हाला जागा देण्याबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याने आता यापुढे काँग्रेसबरोबर युतीबाबत चर्चा करून काहीच उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात चांगल्या संख्येने उमेदवार देण्याची क्षमता असल्याचे पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस 1999 पासून गोव्यात आहे. येथे पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. येत्या निवडणुकीत पुरेशा संख्येने उमेदवार देऊन ते निवडून आणू. एखाद्या समविचारी पक्षास युती करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.
Election 2022 : ‘त्या’ प्रचारावर निवडणूक आयोगाची बंदी कायम; पहा, आता काय घेतलाय नवा निर्णय