मुंबई – भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कोहलीने हा निर्णय घेतला आहे. या मालिकेत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
कोहलीने मागच्या तीन महिन्यांत तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. आता कोहलीने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आहे.
कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले टीम इंडियाला योग्य दिशेने नेण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि काहीही सोडले नाही. सर्व गोष्टी एका वेळी येतात आणि थांबतात. आता माझ्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची वेळ आली आहे.
त्याने लिहिले या प्रवासात माझ्याकडे अनेक चांगले आणि वाईट क्षणही आले, पण मी माझे प्रयत्न कधीच सोडले नाहीत आणि संघावर विश्वास ठेवण्याचे थांबवले नाही. मी नेहमीच मैदानावर 120 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. मला हे जमत नसेल तर ते करणे योग्य नाही असे मला वाटते. माझे मन शुद्ध आहे आणि मी माझ्या संघाचे वाईट करू शकत नाही.
2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कोहली कसोटी कर्णधार बनला होता. तो टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटींमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत. संघाला 17 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले तर 11 कसोटी अनिर्णित राहिल्या. दुसर्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. ज्याने 60 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि त्यापैकी टीम इंडियाने 27 सामने जिंकले.