Election 2022 : 5 राज्यांतील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात; जाणून घ्या, महत्वाचे अपडेट
मुंबई : देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः उत्तर प्रदेश राज्याचा दौरा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशातील 5 राज्यात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणुकीत असेल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेसबरोबर 5 जागांवर निवडणूक लढणार आहोत. तसेच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असे पवार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के. शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. त्यामुळे मला वाटते की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठे वक्तव्य पवार यांनी केले आहे.
दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशात 14 जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. या राज्यात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.
निवडणुकीआधी भाजप राज्याला झटके..! उत्तर प्रदेशच्या मंत्र्यासह आमदाराचे राजीनामे; पहा, काय आहे कारण ?