मुंबई : बॉलिवूडच्या किंग खान अर्थात शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत शाहरुख खान हा मुंबईतील वांद्रे परिसरातील ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते ‘मन्नत’ बाहेर जमलेले असतात. मात्र, शाहरुखचा हा ‘मन्नत’ बंगलाच बॉम्बने उडवून देऊ, तसेच मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले व बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. जितेश ठाकूर, असे या आरोपीचे नाव आहे. 6 जानेवारी 2022 रोजी जितेशने फोन करुन ही धमकी दिली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षात 6 जानेवारीला एक फोन आला. त्यात समोरील व्यक्तीने शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. तसेच मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन काॅलचे लोकेशन शोधले असता, हा नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याचे समोर आले..
जबलपूरचे ‘सीएसपी’ आलोक शर्मा यांनी सांगितले, की जबलपूरमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा काॅल आल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली. संबंधित आरोपीला अटक करण्यासाठी मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार, आम्ही मदत केली. आम्ही आरोपीला 8 जानेवारीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे आरोपी जितेश ठाकूर याला अटक केली आहे. आरोपीला दारूचे व्यसन असून, त्याने यापूर्वीही खोटे कॉल करून पोलिसांना जेरीस आणल्याचे जबलपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोपाल खंडेल यांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीला अटक केलेली असली, तरी त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळलेले नाही. जितेश ठाकूर याच्याविरुद्ध धमकावणे, सार्वजनिक सेवेला खोटी माहिती देणे, या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खंडेल यांनी सांगितले.
ठाकरे सरकारकडून निर्बंधात पुन्हा एकदा सुधारणा, राज्यातील दुकानांबाबत घेतला मोठा निर्णय..
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स