शिवभोजन केंद्रावर खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याची दखल घेत, ठाकरे सरकारने आता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश दिला आहे.
शिवभोजन थाळी.. ही ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी योजना.. अवघ्या 10 रुपयांत गरजूंना शिवभोजन केंद्रावर भोजन देण्यात येते. मात्र, या योजनेत मोठा घोटाळा होत असल्याच्या आरोप विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झाला होता.
एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरुन शिवभोजन केंद्र चालकांनी शिवभोजन थाळीचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हिवाळी अधिवेशन काळात केला होता. शिवसेना नेते व कार्यकर्त्यांना कमाईचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठीच शिवभाेजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरु केलेल्या योजनेत मोठा भ्रष्टाचार सुरु असून, हा एक प्रकारे महाराजांचाही अपमान असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती.
दरम्यान, विरोधकांच्या आरोपानंतर ठाकरे सरकारने राज्यातील शिवभोजन केंद्रांवर 31 जानेवारी 2022 पर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश दिला आहे.
आदेशात काय म्हटलंय..
- शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अनिवार्य असेल. शिवभोजन केंद्राची जागा व्यापेल, अशा पद्धतीने ही यंत्रणा बसवावी.
- केंद्र स्पष्टपणे दिसू शकेल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक.
- केंद्र चालकाने शिवभोजन वाटपाच्या किमान ३० दिवसांचे प्रक्षेपण तपासणीस उपलब्ध राहिल, याची दक्षता घ्यावी. हा डेटा अधिकाऱ्यांना लागेल, तेव्हा तपासणीस उपलब्ध करुन द्यावा.
- केंद्रांबाबत तक्रार आल्यास, अनियमितता आढळल्यास प्रक्षेपण तपासून अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.
कोरोनाला रोखण्यासाठी जोरदार तयारी.. आजच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय; आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली माहिती
हिवाळ्यात नाश्त्यासाठी तयार करा टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल; ही आहे सोपी रेसिपी..