पुणे : खरीप हंगामातील महत्वाचे पीक म्हणजे, तूर… सोयाबीन पाठोपाठ तुरीच्या पिकाला शेतकऱ्यांचे प्राधान्य असते. यंदाच्या हंगामात राज्यात 13 लाख 35 हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. अतिवृष्टी, अवकाळी पावसाचाही या पिकावर परिणाम झाला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पदरात भरघोस माप पडेल, अशी आशा असतानाच माशी शिंकली.. पीक अंतिम टप्प्यात असतानाच ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे कीड व रोगराईचा प्रादुर्भावाने तुरीच्या शेंगा पोसल्याच नाहीत.
तुरीचे पीक अंतिम टप्प्यात असताना ढगाळ वातावरणामुळे त्यावर मर रोग, शेंगा पोखरणारी अळी नि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागानेच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील एकूण लागवडीपैकी 28 टक्के क्षेत्राला रोगराईचा फटका बसलाय. धुक्यांमुळे फूलगळ झाली. पाणथळ जमिनी, नदी-नाल्याकाठच्या जमिनीत पाणी साचून राहिल्याने मर रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. खरीप हंगामात सुरुवातीपासून 5 महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे पीक जोपासले. मात्र, आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात 20 टक्के घट झाल्याचा अंदाज आहे.
हमीभाव खरेदी केंद्र उद्यापासून सुरु होणार
दरम्यान, अस्मानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांना सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. ढगाळ हवामानाने पिकाच्या उत्पादनात घट झालेली असतानाच, आता चांगल्या दराबाबत बोंब आहे.. यापूर्वीच तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राचाच आधार आहे. कारण, या ठिकाणी शेतकऱ्यांना तुरीला 6300 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे.
मराठवाड्यात सोयाबीन पाठोपाठ तुरीचे उत्पादन घेतले जाते. आंतरपिक म्हणून तूरच पेरली जाते. मात्र, यंदा उस्मानाबाद, परभणी, बीड, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. उत्पादनात घट झाल्याने, दर वाढतील अशी आशा होती, पण आतापर्यंत बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमीच दर मिळाला आहे. आता 1 जानेवारीपासून राज्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरु होणार आहेत. त्यानंतर तरी तुरीला चांगला दर मिळेल, अशी आशा आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील सर्वच पिकांवर पावसाचा व बदलत्या वातावरणाचा परिणाम झालाय. महाराष्ट्र नि कर्नाटक राज्यातील तूर पिकाच्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले असून, दोन्ही राज्यातील तूर उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे. कर्नाटकातील गुलबर्गा, तलिकेट आणि बिदर भागात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक; दर महिन्यास मिळेल उत्पन्नाची हमी; जाणून घ्या डिटेल..
खबरदारी : नवीन वर्षात प्रियजनांच्या सुरक्षेसाठी या पाच गोष्टींची घ्या विशेष काळजी