मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावर परत येण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या कर्मचाऱ्यांना 13 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्याला कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवत संपावर ठाम असल्याचे सांगितले.
एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम असल्याने आता राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.. त्यावर आता मंत्री परब यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. रत्नागिरी दौऱ्यावर असताना, पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.
शांत बसणार नाही..
मंत्री परब म्हणाले, की “सरकार आता हातावर हात ठेवून बसू शकत नाही. एसटीच्या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीचीही कारवाई केली जाऊ शकते. सरकारला कोणत्याही कर्मचाऱ्यावर अशी कारवाई करण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा बंद पाडली जात असेल, तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करीत आहेात. ते वापरावे लागतील.”
एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावणार की नव्याने नोकर भरती करणार? या प्रश्नावर परब म्हणाले, की “मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर त्यावर निर्णय घेऊ. आतापर्यंत २२ हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एसटीची १२५ डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे. विदर्भ-मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. २० तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल.”
परब यांच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान, शासकीय विश्रामगृहात मंत्री परब मुक्कामी आले होते. तेथून 100 मीटरवर एसटी आंदोलक असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. राज्यभर एसटी संप सुरू असून, आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित केले आहेत. अडीच हजारांपेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली. आता निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते..
महाराष्ट्रात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुराळा…! पण सुप्रिम कोर्टाच्या या अटी पाळाव्या लागणार….
बाब्बो.. तरीही ‘तिथे’ पोहोचलाय कोरोना; पाकिस्तान क्रिकेटचे टेन्शन वाढले; पहा, नेमके काय घडलेय..?