मुंबई : ब्रिटीश काळात शेतकरी दबला होता, पिचला गेला होता, मात्र, त्यापेक्षा आता अधिक भयावह अवस्थेतून देशातील शेतकऱ्यांना जावे लागत आहे. सरकार कोणाचेही असो, संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक दिवसही चर्चा होत नाही. प्रसारमाध्यमेही बड्या भांडवलदारांच्या खिशात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असल्याचा सूचक इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ यांनी दिलाय..
सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘शेतकरी, प्रसार माध्यमांसह विविध विषयांवर परखड भाष्य केले. पी. साईनाथ म्हणाले, की “भारत कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱ्यांना न्यायासाठी सातत्याने झगाडावे लागते. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे देशातील सर्वाधिक ताकदीचे आणि यशस्वी झालेले आंदोलन म्हणावे लागेल. या आंदोलनाची नोंद इतिहासात होईल.”
कृषि उत्पन्न बाजार समित्या, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही स्वर्ग नाहीत. त्या तर सरकारच्या इशाऱ्यावरच चालतात. शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतमालाला योग्य हमीभाव मिळाल्यास, देशातील अनेक समस्या सुटू शकतात. समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे शेतीत राबणाऱ्या स्त्रियांच्या कष्टाची तर दखलही घेतली जात नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला..
माध्यम संस्था उद्याेजकांच्या खिशात
ते म्हणाले, की “कोरोना संकटात अनेक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले. मात्र, याच काळात अंबानी यांच्या वैयक्तिक उत्पन्नात दुपटीने वाढ होते, हे कशाचे लक्षण आहे? अंबानींनी अनेक माध्यम संस्था विकत घेऊन खिशात घातल्या आहेत. या माध्यम संस्था मालकांशीच इमानी राखणार आणि त्यांचीच री ओढणार, यात नवल नाही. परंतु अशा बड्या भांडवलदारांशी संबंध नसलेल्या माध्यम संस्थाही जाहिरातींच्या लालसेपोटी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत.”
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत सरकार विरोधात झगडण्याची मानसिकता शेतकऱ्यांना ठेवावी लागणार असल्याचे साईनाथ यांनी सांगितले.
मोदींचे खाते हॅक झाल्याने उडाली खळबळ; समजून घ्या ट्विटर अकाउंटबाबत काही महत्वाची माहिती
..म्हणून ‘त्यामध्ये’ गुजरात पडलेय मागे; पहा, कोणत्या राज्याला मिळालाय पहिला नंबर