मुंबई : ठाकरे सरकारने पगारवाढ करण्याची घोषणा केल्यानंतर एसटीचे अनेक कर्मचारी कामावर परत येत आहेत. अर्थात, संप मागे घेतल्याची कोणतीही घोषणा अद्याप कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी केलेली नसली, तरी संपाची धार कुठेतरी कमी झाल्याचे चित्र आहे..
आतापर्यंत राज्यात एसटीचे सुमारे १९ हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे काल (सोमवारी) राज्यातील २५० पैकी १०५ आगारांतून एसटीचे चाक फिरू लागले आहे. मात्र, अजूनही १४५ आगारे बंद असल्याचे दिसते.
संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक करताना आतापर्यंत ४० हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, गेट बंद करणे आदी प्रकारांमुळे ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ केली असली, तरी त्याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन नि डिसेंबरमधील वेतनातील तफावत लक्षात यावी, यासाठी या दोन महिन्यांची वेतनचिठ्ठी आगारात लावली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कामावर हजर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसारच पगार दिला जाणार आहे. सुमारे १९ हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांवर पगार जमा होणार आहे. मात्र, कामावर हजर न झालेले नाहीत किंवा ज्यांच्यावर सेवा समाप्ती अथवा निलंबनाची कारवाई केली आहे, त्यांना यातून वगळले आहे. पगार जमा होण्यास आजपासूनच (ता. 7) सुरूवात होणार असून, पुढील 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले..
कामावर हजर न झाल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. या कर्मचाऱ्यांविरुद्ध एसटी महामंडळाने कॅव्हेट दाखल केले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आता न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागणार आहे.. त्याशिवाय त्यांना कामावर रूजू होता येणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एसटी महामंडळाने कामगार न्यायालयात कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचे घोषीत करण्याकरिता संदर्भ अर्ज सादर केलेले आहेत. संप बेकायदेशीर घोषीत झाल्यास कर्मचाऱ्यांवरील कारवाई कायदेशीर ठरणार आहे. कामगार न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले आहे. जे कर्मचारी कामगार न्यायालयात बाजू मांडणार नाही, त्यांच्याबाबत एकतर्फी निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
नगरमधील ‘या’ बॅंकेवर ‘आरबीआय’कडून निर्बंध, खातेदारांना फक्त 10 हजार रुपये काढता येणार..
काम की बात : एटीएममशीनमध्ये अडकलेत पैसे तर घाबरू नका.. असे मिळावा पैसे