मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी भारताने 372 धावांनी जिंकली. धावांच्या फरकाने मिळवलेला भारताचा हा सगळ्यांत मोठा विजय ठरला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी बाजी मारली. कानपूर येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती.
न्यूझीलंडतर्फे खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या एझाझ पटेलने पहिल्या डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. असं करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला केवळ तिसरा खेळाडू ठरला. मात्र, त्याच्या या कामगिरीनंतरही न्युझीलंडला ही टेस्ट जिंकता आली नाही..
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात एझाझ पटेलच्या फिरकीसमोर टीम इंडियाचे इतर फलंदाज बाद होत असतानाही मयांक अगरवालने शानदार शतक ठोकले. त्या बळावर टीम इंडियाने 325 धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डाव 62 धावांतच गडगडला. न्यूझीलंडच्या दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. रवीचंद्रन अश्विनने 4, तर मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने दुसऱ्या डावात न्युझीलंडला फॉलोऑन न देता, पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात भारताने 276/6 धावसंख्येवर डाव घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं.
मयांक अगरवालने पहिल्या डावातील फॉर्म कायम राखत 62 धावांची खेळी केली. शुभमन गिलचं अर्धशतक तीन धावांनी हुकलं. चेतेश्वर पुजारानेही 47 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 26 चेंडूत नाबाद 41 धावा चोपल्या.
मात्र, दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची घसरगुंडी कायम राहिली. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था 140/5 अशी झाली होती. चौथ्या दिवशी अवघ्या 40 मिनिटांत भारतीय संघाने न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. डेरेल मिचेल (60) व हेन्री निकोल्स (44) वगळता कोणालाही खेळपट्टीवर टिकता आले नाही..
महावितरणचा पाय खोलात..! म्हणून वीज तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण..
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले.. या कारणांमुळे हे पैसे मिळेनात..