नवी दिल्ली : ई-काॅमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बऱ्याचदा ऑनलाईन वस्तू मागवताना त्या वस्तूच्या दर्जाबाबत फारसे पाहिले जात नाही. त्यात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांची पूर्तता न करणारे ‘प्रेशर कुकर’ विकल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा (CCPA) ने अनेक विक्रेत्यांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, त्यात अमेझाॅन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), पेटीएम (Paytm) मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘सीसीपीए’ने स्वतःहून दखल घेत, ‘बीआयएस’ मानकांची पुर्तता न करणाऱ्या विविध कंपन्यांना नोटिसा बजावल्या असून, त्यावर येत्या 7 दिवसांत उत्तर देण्यास सांगिले आहे. ‘सीसीपीए’ 18 नोव्हेंबर रोजी या ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रेशर कुकर ऑफर करणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. BIS मानकांची पूर्तता न करणारे कुकर विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्त ‘सीसीपीए’ने बनावट उत्पादनांविरुद्ध देशव्यापी मोहीम सुरु केली आहे. मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने ई-कॉमर्स कंपनी कशा काय विकू शकतात, असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. अशा कंपन्यांनी मानकांची पूर्तता केल्यानंतरच विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकण्याची परवानगी द्यावी. त्यांनी आपला व्यवसाय जबाबदारीने चालवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘सीसीपीए’ने सर्व जिल्ह्यांना यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही बेकायदेशीर उत्पादनांची विक्री आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यात देण्यात आले आहेत. सोबतच ‘सीसीपीए’ने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी, आयएसआय (ISI) लोगाे असणारी, दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अनेक मोहिमा राबविल्या असल्याचे सांगण्यात आले.
शेअर्स बाजार कोसळला..! भांडवली बाजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
बाप रे..! पुलवामा हल्ल्यासाठी रसायनांची खरेदी अमेझाॅनवरुन.. तपासात धक्कादायक गोष्टी समोर..