भारताने घेतला टी- 20 विश्वचषकाचा बदला.. न्यूझीलंडचा टी-20 मालिकेत 3-0 ने केला पराभव
कोलकाता : भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या T-20 सामन्यात न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. भारतीय संघाने टी- 20 विश्वचषकातील पराभवाचा बदल घेतला.
नवा टी-20 कर्णधार रोहित शर्मा आणि नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली संघाने हा टप्पा गाठला. यापूर्वी 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाने 5-0 असा विजय मिळवला होता.
शेवटच्या T-20 मध्ये टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून सर्वबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा हा सलग सहावा विजय ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. इशान 21 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव अपयशी ठरला आणि शून्यावर बाद झाला.
ऋषभ पंतही फार काही करू शकला नाही आणि 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार असलेल्या मिचेल सँटनरने भारताला पहिले तीन धक्के दिले. भारताला आज मधल्या फळीत विराट कोहलीची उणीव जाणवली. रोहित आणि श्रेयसने 83 धावांत तीन गडी गमावल्यानंतर 20 धावा जोडल्या. यादरम्यान रोहितने टी-20 कारकिर्दीतील 26 वे अर्धशतक झळकावले.
ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडला पाचवे यश मिळवून दिले. त्याने वेंकटेश अय्यरला (20) चॅपमनकरवी झेलबाद केले. व्यंकटेश बाद झाल्यानंतर अवघ्या दोन चेंडूंवर अॅडम मिल्नेने श्रेयस अय्यरला (25) बाद केले. हर्षल पटेल (18) च्या स्कोअरवर हिट-विकेट आऊट झाला.
दीपक चहरने अखेरच्या षटकात शानदार खेळी करत नाबाद २१ धावा केल्या. त्याच्यासोबत अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून सँटनरने ३ बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट, मिलने, फर्ग्युसन आणि सोधीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. अखेरच्या 5 षटकांत भारताने तीन विकेट्स गमावून 50 धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. संघाला 21 धावांच्या एकूण धावसंख्येवर डॅरिल मिशेलच्या रूपाने पहिला धक्का बसला. किवी संघाच्या डावातील तिसऱ्या षटकात रोहितने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला आणि या डावखुऱ्या फिरकीपटूने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. त्याने डेरिल मिशेलला त्याच्या पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलकडे झेलबाद केले.
मिशेलला 5 धावा करता आल्या. यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षरने मार्क चॅपमनला यष्टिचित केले. चॅपमन शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर प्रथमच चॅपमन शून्यावर बाद झाला. अक्षरने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. त्याने ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड केले. फिलिप्स शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. फिलिप्स आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये खाते न उघडताच दुसऱ्यांदा बाद झाला. न्यूझीलंडने 30 धावांत तीन विकेट गमावल्या.
गुप्टिलला दुसऱ्याच षटकात दीपक चहरने जीवदान दिले. याचा फायदा घेत त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधले 20 वे अर्धशतक झळकावले. सेफर्ट धावबाद झाला. हर्षल पटेलने जेम्स नीशमला (३) बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. कर्णधार मिचेल सँटनरही फार काही करू शकला नाही आणि दोन धावा करून इशान किशनच्या थेट फेकीवर धावबाद झाला. व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंडला आठवा धक्का दिला. त्याने अॅडम मिलनेला (7) रोहितकरवी झेलबाद केले. व्यंकटेशची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय विकेट होती.
यानंतर हर्षल पटेलने ईश सोधीला आणि दीपक चहरने लॉकी फर्ग्युसनला बाद करून न्यूझीलंडचा डाव 111 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून अक्षरने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी हर्षल पटेलने दोन गडी बाद केले. दीपक, चहल आणि व्यंकटेश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.