मुंबई : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण केल्याशिवाय हा संप मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. राज्यातील एसटी सेवा मागील 10-12 दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, एसटी महामंडळाचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० ते ३५० कामगारांना अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. या कामगारांनी २४ तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येणार असल्याची नोटिस एसटी महामंडळाने या कर्मचाऱ्यांना बजावली आहे.
एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपात तात्पुरत्या नेमणूकीवर सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. महामंडळाने आतापर्यंत एकूण २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे मोडून काढण्याच्या तयारीत महामंडळ असल्याचे दिसते आहे.
एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्या युनियनचे प्रतिनिधी सरकारला भेटून चर्चा करीत आहेत. त्यांच्या अनेक मागण्या मार्गी देखील लावल्या आहेत. मात्र, ते पुन्हा चर्चेसाठी येत नाहीत, अशा परिस्थितीत काय करायचे, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.
सध्या कामगारांचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. कामगारांशी चर्चा करून तुम्हाला कळवितो असे सांगून ते गेले, पण पुढं काहीच झालेलं नाही, अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न परब यांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला आहे.
7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर
दरम्यान, आतापर्यंत एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी ड्युटीवर हजर झाले असून, मंगळवारी (ता. 16) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या होत्या. त्यातून 1852 प्रवाशांनी प्रवास केला.
आयसीसीने केली मोठी घोषणा..! क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक केले जाहीर; पहा, कुठे होणार टी 20 विश्वकप, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा
श्रीमंताच्या यादीत चीनचा अमेरिकेला धोबीपछाड, किती झपाट्याने वाढलीय संपत्ती पाहा..?