जरा हटके : भारतातील असे अनोखे रेल्वे स्टेशन जेथे जाण्यासाठी घ्यावा लागतो पाकिस्तानी व्हिसा आणि पासपोर्ट
नवी दिल्ली : भारताबाहेर इतर कोणत्याही देशात जायचे असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असतो. मात्र तुम्ही कधी ऐकले आहे का की देशातच रेल्वेने प्रवास करण्यासाठी दुसऱ्या देशाचा पासपोर्ट आणि व्हिसा लागतो? होय, भारतात असे एक स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी शेजारील देश पाकिस्तानचा व्हिसा आणि पासपोर्ट आवश्यक लागतो.
याशिवाय तुम्ही प्रवास पूर्ण करू शकत नाही आणि तसे न करणे तिथे बेकायदा मानले जाते. जर तुम्ही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय येथे पकडले गेले तर तुम्ही थेट तुरुंगात जाऊ शकता. चला जाणून घेऊ या त्या स्टेशनबद्दल…
आम्ही ज्या रेल्वे स्टेशनबद्दल बोलत आहोत ते देशातील एकमेव स्टेशन आहे जिथे भारतीय नागरिकांना पाकिस्तानी व्हिसा घ्यावा लागतो. पाकिस्तानच्या सीमेजवळील अटारी हे भारतातील असे रेल्वे स्टेशन आहे. तेथे जाण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची आवश्यकता असते. या रेल्वे स्थानकाचे पूर्ण नाव अटारी श्याम सिंह आहे.
हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. या स्थानकावर व्हिसाशिवाय पकडले गेल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीनही मिळत नाही.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेले अटारी रेल्वे स्थानक नेहमीच सुरक्षा दलांच्या नजरेखाली असते. गुप्तचर यंत्रणा 24 तास सुरक्षा कॅमेऱ्यांसह येथे लक्ष ठेवून आहे. इतकेच नाही तर या रेल्वे स्थानकावरून रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व प्रवाशांचा पासपोर्ट क्रमांक लिहिला जातो आणि त्यानंतर त्यांना प्रवासासाठी कन्फर्म सीट मिळते.
सुरक्षेच्या दृष्टीने या स्थानकावर कुलींना (हमाल) राहण्याची परवानगी नाही. येथे तुम्हाला तुमचे साहित्य एकट्याने घेऊन जावे लागेल, परंतु याशिवाय तुम्हाला येथे सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. येथे लावलेल्या एलईडी टीव्हीवर तुम्हाला देशभक्तीपर गाणी, चित्रपट ऐकायला आणि बघायला मिळतील.