बाबा रामदेव यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका, कशामुळे योगगुरु अडचणीत आलेत, नेमकं काय झालंय..?
नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी काही महिन्यांपूर्वी अॅलोपॅथीसंदर्भात मोठे आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. कोरोना संसर्ग झालेल्या अनेकांच्या मृत्यूसाठी अॅलोपॅथी उपचार पद्धती जबाबदार होती. तसेच कोरोनावर कोरोनिल औषधच प्रभावी असून, कोरोनिल रोगप्रतिकारक शक्ती वाढवित असल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला होता.
दिल्ली मेडिकल असोसिएशनकडून बाबा रामदेव यांच्या आरोपांवर जोरदार आक्षेप घेत, थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. बाबा रामदेव ही समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. बाबा रामदेव केवळ कोरोना लसीकरणावर नाही, तर अॅलोपॅथी उपचारांवरही संशय व्यक्त करीत असून, हे चुकीचे आहे. कोरोनिलसाठी त्यांनी अशा प्रकारचे निराधार आरोप करताना, जनतेची दिशाभूल केली. दरम्यान, बाबा रामदेव यांची विधाने मार्केटिंग आणि व्यावसायिक लाभासंदर्भात असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले..
दरम्यान, दिल्ली मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, या याचिकेत तथ्य नसल्याने ती रद्द करण्याची मागणी बाबा रामदेव यांच्या वतीने करण्यात आली होती.
कोर्टाने नेमकं काय म्हटलंय..?
याचिकेवर सुनावणी करताना न्या. सी. हरिशंकर यांनी म्हटले, की याचिकेत केलेल्या आरोपांचा विचार केला जाऊ शकतो. आरोप योग्य किंवा चुकीचेही असू शकतात. तुम्ही आरोपांचे खंडनही करू शकता किंवा असे काही म्हटले नव्हते, असाही दावा करू शकता. मात्र, याचिकेतील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. त्यामुळे याचिकेवर सुनावणी सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय याचिका रद्द किंवा बाद करू शकत नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.
दरम्यान, न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी सुरू ठेवणे, ही बाब बाबा रामदेव यांच्यासाठी धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
एसटीचा प्रवास महागला.. एसटी महामंडळाने किती दरवाढ केलीय, वाचा..
गुड न्यूज : आयबीपीएस भरणार बँकांमधील पीओ, एमटीच्या इतक्या जागा… जाणून घ्या किती आहेत जागा..