मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर पिकांसह शेती-माती वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोणत्याही उत्पन्नाची हमी नसल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा हताश झाला होता. सगळ्यांचे लक्ष राज्य सरकारकडे लागले होते.
ठाकरे सरकारने हताश, निराश झालेल्या या बळीराजासाठी अखेर ‘गूड न्यूज’ दिली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच 3600 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जालना येथे झालेल्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करीत आहे. अतिवृष्टीमुळे जून महिन्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
भुसे म्हणाले, की ‘जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या सामूहिक शेततळ्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आगामी काळात सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले. ‘शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाल्याच्या तक्रारी आल्या असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सुचना भूसे यांनी केली.
हद्दच झाली : कोरोनाचा आलाय नवा अवतार.. भारतासह कोठे आढळला हा विषाणू
ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून जाणार `हा` चित्रपट.. १४ चित्रपटातून झाली निवड..