मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी सकाळी पुन्हा वाढ झाली.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम आता दिसू लागला आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतर गोष्टीही महाग झाल्या होत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकरी वर्गालाही सहन करावा लागत आहे. शेतमाल वाहतूक, शेतातील मशागती, बियाणे, खते यांच्या किमतीही वाढल्या आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्यादरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केली आहे. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत झाली आहे.
आजची दरवाढ धरून ऑक्टोबर महिन्यातील ही १५ वी दरवाढ आहे. इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत गेले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहोचले आहेत.
ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. मागील तीन दिवस आणि इतर दोन दिवस वगळल्यास दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.
ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल ४.४५ रुपयांनी महाग झाले आहे तर डिझेल पाच रुपयांनी महाग झाले आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होत असल्याचे सांगितले जात आहे.