मुंबई : प्रत्येकाची इच्छा असते की एक समजूतदार जोडीदार मिळावा. जो आपली काळजी घेईल. एखादे जोडपे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेल्यांनतर त्यांचे जग पूर्णपणे बदलते. दोघेही जोडीदारासह प्रेमाच्या नात्यात टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ लागतात. पण विवाहित जीवनात जितके जास्त प्रेम असते तितकाच अधिक संघर्षही असतो. छोटी-मोठी भांडणे तर प्रत्येक घरात होतच असतात. ते काही फारसे गंभीर नसते. मात्र काही दिवसानंतर पती-पत्नींमधील भांडणे खूपच वाढू लागली. कुरबुरी दररोजच घडू लागल्या तर त्यामागे काही कारणे असतात. कोणती असतात ती कारणे जाणून घेऊ..
सासरच्या मंडळींबद्दल काहीही बोलणे : बरेच लोक त्यांच्या सासरच्या मंडळींशी वाईट वागतात. एकवेळ विनोदाचा भाग म्हणून काही बोलणे ठीक असते. मात्र तुम्ही असेच काहीसे चेष्टेने बोलले पण तुमच्या जोडीदाराच्या मनात राहू शकते. त्यातून एखाद्यावेळी वाद होऊ शकतो. त्यामुळे सासरच्या लोकांविषयी चांगले बोलावे. एकत्र राहून पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या पालकांचा आदर करावा म्हणजे वाद टाळले जातील.
जोडीदाराचा अनादर : आपल्या जोडीदाराने त्याचा आदर करावा असे प्रत्येकाला वाटत असते. मग तो पती असो वा पत्नी. पण अनेक नात्यांमध्ये असे दिसून येते की पती पत्नीचा आदर करत नाही किंवा पत्नी पतीचा आदर करत नाही. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. असे केल्याने अनेक वेळा अनावश्यक भांडणे होतात. ज्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.
जेवणाच्या चवीवरून वाद : पती-पत्नीमध्ये अनेकदा जेवण कसे झाले यावरूनही वाद होतात. वास्तविक, जेवणात मीठ जास्त झाले, भाजी चवदार नाही, अन्न व्यवस्थित शिजत नाही, चपाती, भाकरी कच्ची आहे आदी तक्रारी अनेकदा पतीकडून केल्या जातात. त्यामुळेही वाद होतात. असे प्रकार घडत असतील तर पतीने पत्नीला जेवण बनविण्यात मदत करावी. यामुळे वाद टळतील.
मुलांच्या जबाबदारीवरून वाद : पती-पत्नी हे आई-वडील होतात, तेव्हा ते खूप आनंदी असतात. पण जेव्हा मुले हळू हळू मोठी होतात, तेव्हा बरीच मुले बिघडू लागतात किंवा अगदी हट्टी होतात. अशावेळी पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. त्यावेळी दोघेही मुलाला बिघडवल्याचा आरोप एकमेकांवर करतात व त्यातूनच वाद होतात. मात्र दोघांनीही समजून घ्यायला हवे की मुलाच्या संगोपनाची जबादारी दोघांचीही आहे. असे समजून घेतल्यास वाद टाळले जातील.