मुंबई – आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षाचा गोंधळ काही केल्या कमी होतानी दिसत नाही. येत्या 24 ऑक्टोबरला, म्हणजेच अगदी तोंडावर परीक्षा आलेली असतानाही हा सावळा गोंधळ सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाच्या या परीक्षेचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय. उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्यातील, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आलेय. परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांनाही प्रवेशपत्र पाठविण्यात आल्याचे समोर येत आहे.
परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील या गोंधळामुळे उमेदवारांमधून ठाकरे सरकारबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत संताप व्यक्त करताना, आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केले असून, आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत, हे योग्य नाही. तसेच यापुढच्या काळात सर्व परीक्षा या ‘एमपीएससी’मार्फतच घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी दोन जिल्ह्यांत परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत आता परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.
उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नसल्याचेही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अरे बापरे.. पाकिस्तानला चीनपाठोपाठ आयएमएफने दिला मोठा धक्का.. जाणून घ्या, काय केले?
चीनचे नापाक इरादे उघड : ऑगस्ट महिन्यात केले असे काही की अमेरिकाही थक्क