नवी दिल्ली – कोरोनाने जगभर थैमान घातलं. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचे संकट कायम असतानाच, काही ठिकाणी मलेरिया या आजारानेही डोकं वर काढले होते. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली होती.
‘एनोफिलिज’ जातीचा मादी डास चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास चावल्यानंतर रुग्णाला ताप, थंडी, सर्दीसारखे लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाची तब्येत बिघडू शकते, त्यात जीवही जाण्याचा धोका असतो.
यूएनच्या एका एजन्सीच्या माहितीनुसार, पाच वर्षांहून कमी वयाची मुलांना सर्वाधित मलेरियाचा धोका असतो. या आजाराविरुद्ध गेल्या दोन दशकांत जगात खूपच प्रगती झाली असली, तरी अजूनही दरवर्षी 20 कोटी नागरिक या आजाराने बाधित होतात. पैकी 4 लाख रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मलेरियावर जगातील पहिली लस मुलांना देण्याची शिफारस केली आहे. ही लस म्हणजे विज्ञान, मुलांचे आरोग्य आणि मलेरिया नियंत्रणासाठी मोठे यश असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. घाना, केनिया आणि मालावीमध्ये २०१९ मध्ये सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निष्कर्षानंतर ‘RTS, S/AS01’ या मलेरिया लशीची शिफारस करण्यात आली आहे.
डासांच्या आजारावरील ही पहिली लस असेल. GSK फार्मा कंपनीने ही लस विकसित केलीय. चार डोसमध्ये ही लस देण्यात येणार आहे. लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांचे चांगले आणि सुरक्षित परिणाम दिसून आले. त्यामुळे ‘डब्लूएचओ’ने या लसीला मान्यता दिली आहे.
मलेरियाला रोखण्याच्या सध्याच्या उपाययोजनांसह या लशीच्या वापरामुळे दरवर्षी हजारो मुलांचे आयुष्य वाचवता येईल, असे ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी सांगितले. ही लस म्हणजे शक्तीशाली हत्यार आहे. परंतु कोविड लशीसारखा हा एकमात्र उपाय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मलेरिया रोखण्यासाठी मच्छरदाणी किंवा ताप रोखण्यासाठीच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मलेरियावरील संशोधनाबद्दल आठवणी सांगताना टेड्रोस म्हणाले, की जगातील या प्राचीन आणि भयानक आजाराविरुद्ध एक प्रभावी लस उपलब्ध होईल, यासाठी आम्ही वाट पाहात होतो. आज तो ऐतिहासिक दिवस आलेला आहे.
फक्त एक रुपया लिटर पेट्राेल..! आपल्या शेजारील देशांमधील इंधनाचे दर पाहून तोंडात बोटे घालाल..!
बाब्बो; पेट्रोल आणायला लोकं चाललेत की नेपाळला; पहा, कुठे घडतोय हा चमत्कारिक प्रकार