नवी दिल्ली : देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले. या पोर्टलला देशातील कामगारांनीही जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. एकाच महिन्याच्या काळात या पोर्टलवर देशातील असंघटीत क्षेत्रातील तब्बल 1 कोटी 3 लाख 12 हजार 95 कामगारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. कामगार नोंदणीत बिहार राज्य देशात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. त्यानंतर ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा नंबर आहे.
देशात सध्या 38 कोटींपेक्षा जास्त असंघटीत कामगार आहेत. याआधी या कामगारांचा कोणताही डेटा उपलब्ध नव्हता. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ या कामगारांना देता येत नव्हता. कोरोना काळात तर कामगारांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. सरकारकडे या कामगारांची निश्चित माहिती नसल्याने सरकारलाही अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे देशातील या कोट्यावधी कामगारांची नोंद व्हावी, त्यांची माहिती सरकारकडे असावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट रोजी ई-श्रम पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर कामगारांची संपूर्ण माहिती नोंदवण्यात येत आहे. या पोर्टलवर मोफत नोंदणी केली जात आहे. या कामासाठी कामगारांना कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वा अन्य कोणत्याही नोंदणीसाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटीत कामगारास 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये तसेच अंशतः अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संबंधित कामगारास मिळतील.
श्रम व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यात सर्वाधिक म्हणजेच 22 लाख 32 हजार 549 कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर ओडिशा 21 लाख 59 हजार 554, उत्तर प्रदेश 11 लाख 76 हजार 911 कामगारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, ट्रान्सपोर्ट, रिटेल, पर्यटन, हेल्थ केअर, खाद्य उद्योग या क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.