लाल मुंग्यांच्या चटणीने कोरोना गायब होणार..? याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने काय म्हटलेय वाचा..?
नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. या आजारावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी अनेकांनी गावठी उपाय सुचिवले. काही ठिकाणी अंधश्रद्धेचा तर कळस झाल्याचे समोर आले. त्यात अशाच एका पारंपरिक उपचाराला परवानगी देण्यासाठी एकाने थेट न्यायालयाचे दार ठोठावले.
हा पारंपारिक उपचार म्हणजे लाल मुंग्यांची चटणी. कोरोनावरील उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर करण्याची परवानगी द्यावी, यासाठी चक्क सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अर्थात सुप्रिम कोर्टाने (Supreme court) ही याचिका फेटाळून लावली आहे.
ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला त्यांनी ओडिशा हायकोर्टात याचिका दाखल केली. लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोविड-19 विषाणूवर केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करीत आहेत. हा दावा कितपत खरा आहे, हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करण्याचा आदेश ओडिशा हायकोर्टाने दिला. मात्र, त्यानंतर हायकोर्टाने ही याचिका फेटाळाली.
ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाला पाढीयाल यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं, पण सुप्रिम कोर्टानेही त्यांची याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.
कोर्टाने काय म्हटलं..
संपूर्ण देशभरात कोरोनासाठी अशा पारंपारिक उपचाराला परवानगी देऊ शकत नाही. कित्येक पारंपारिक उपचार आहे. आपल्या घरातही अनेक पारंपारिक उपचार केले जातात. पण या उपचारांचा परिणाम स्वतःला भोगावा लागतो. संपूर्ण देशासाठी आम्ही अशा पारंपारिक उपचाराचा अवलंब करण्यास सांगू शकत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
मुंग्यांच्या चटणीत काय असतं..?
याचिकाकर्ते पाढीयाल यांच्या मते, चटणीत फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच त्याचा बर्याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो. आदिवासी भागात कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते, असे मत पाढीयाल यांनी व्यक्त केले होते.
करदात्यांना दिलासा.. आयटीआर भरण्यासाठी मोदी सरकारकडून मुदतवाढ, कसा होणार फायदा..?
कच्च्या तेलाच्या भावात वाढ..! पेट्रोल-डिझेलच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय, वाचा..!