नवी दिल्ली : आयकर विवरणपत्र (Income Return) भरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पी भाषणात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकार 75 वर्षे आणि त्यावरील वयोवृद्ध नागरिकांना दिलासा देणार असल्याचे म्हटले होते.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात, 75 वर्षे वा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना कर परतावा भरण्यापासून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आयकर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यासाठी घोषणापत्र अधिसूचित केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना हे घोषणापत्र (फॉर्म) बँकांकडे जमा करावा लागणार आहे. ज्यांचे त्याच बँकेत पेन्शन उत्पन्न आणि मुदत ठेवींवर (एफडी) व्याज मिळते. अशा ज्येष्ठ नागरिकांना 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी नियम आणि घोषणा फॉर्म अधिसूचित केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म बँकेत सादर करावा लागेल, जे पेन्शन आणि व्याज उत्पन्नावर कर कापून सरकारकडे जमा करील. जेथे पेन्शन जमा केले जाते, त्याच बँकेतून व्याज उत्पन्न प्राप्त होते, त्या बाबतीत आयकर भरण्याची सूट देण्यात आली आहे.
प्राप्तिकर कायद्यानुसार, निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांना रिटर्न भरावे लागते. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी (60 वर्षे किंवा अधिक) आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षे आणि त्याहून अधिक) थोडी जास्त आहे. टॅक्स रिटर्न न भरल्याने दंड आकारला जातो. तसेच संबंधित व्यक्तीला अतिरिक्त कर कपात (टीडीएस) भरावी लागते.
अनुपालनाचे ओझे कमी करण्यासाठी 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना बजेटमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आल्याचे नांगिया अँड कंपनी एलएलपीचे संचालक इतेश दोधी यांनी सांगितले आहे.
एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..
क्रिप्टोकरन्सीला सोन्याचे दिवस, बिटकाॅईनमध्ये पुन्हा तेजी, इथेरियमने खाल्लाय भाव..!