जलयुक्त शिवार योजनेत गैरप्रकार..? समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, त्यात काय म्हटलेय पाहा..?
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांशी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने या योजनेतील कामाची चौकशी करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचा ठपका अहवालात असल्याची माहिती मिळाली.
जलयुक्त शिवार योजनेतील एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. गैरप्रकार झालेल्या कामांची ACB मार्फत, तर काही कामांची प्रशासकीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारची काही कामे केवळ कागदावर दाखविण्यात आली, कोणतेही काम न करता बिल काढण्यात आल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे.
जलयुक्त शिवार योजनेवर 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होऊनही पाण्याची गरज भागविण्यात योजनेला अपयश आल्याचेही अहवालात म्हटले असल्याचे समजले.
दरम्यान, यापूर्वी कॅगने केलेल्या चौकशी अहवालातही जलयुक्त शिवार योजनेतील कामांत गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवला होता. ‘जलयुक्त’मध्ये 6 लाख 30 हजार कामे करण्यात आली. ‘कॅग’ने त्यातील 6 जिल्ह्यांतील 1800 कामे तपासली असता, त्यातील 600 ते 700 कामांत गैरप्रकार झाल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच कामांची ACB मार्फत चौकशी करण्याची शिफारस विजयकुमार समिती केलीय.
दरम्यान, भाजपचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी ही चौकशी केल्याचा आरोप केलाय. जलयुक्त शिवार ही महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीतील एक मोठी लोकचळवळ होती आणि पुढेही राहील. कारण, मुळातच ही सरकारी योजना नव्हे, तर शेतकर्यांनी राबविलेले अभियान होते. योजनेला बदनाम करताना, महाविकास आघाडी सरकारने किमान अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचे पाप करू नये, असे शेलार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, की मुळात ज्यांनी चौकशी केली, ते विजयकुमार हेसुद्धा फडणवीस सरकारच्या काळात कृषी सचिव होते. या योजनेच्या अंमलबजावणीत त्यांचीही महत्त्वाची भूमिका होती, मग विजयकुमार यांनी स्वत:चीच चौकशी केली की काय, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
प्रलंबित 5.79 कोटीचे अनुदान जमा होणार; 844 शेतकऱ्यांना मिळणार लाभ..!
राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा काँग्रेसला फटका; काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा