‘इस्रायल-पॅलेस्टाईन’साठी भारतातही रंगली लढाई; पहा कंगना-इरफानने काय म्हटलेय
मुंबई : जगभरातील राजकारणाचा उटारेटा करण्यात भारतीयही काही कमी नाहीत. इकडे गल्लोगल्ली आणि गावोगावी करोना रुग्णांच्या मुद्द्यावर सामाजिक बाजूने न लढणारे सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते ‘इस्रायल-पॅलेस्टाईन’साठी सोशल मीडियामध्ये लढाई खेळत आहेत. त्यात क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकारही आता उतरायला लागले आहेत.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि सुप्रसिद्ध फटकळ अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात यानिमित्ताने वाकयुद्ध सुरू झालेले आहे. पॅलेस्टाईनच्या मुद्यावर सोशल मीडियावर हे ‘समोरासमोर’ आले आहेत. मंगळवारी इरफानने ट्वीटद्वारे पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविला. त्यांनी ट्वीट केले की, “जर आपल्याकडे थोडी माणुसकी असेल तर पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडत आहे त्याचे आपण समर्थन करणार नाही.”
त्यावर धार्मिक राजकारणात खूप रस असलेल्या कंगनाने इंस्टाग्रामवर मेसेज केला आहे. कंगणाचे ट्विटर अकाउंट बंद केलेले आहे. तिच्या बोगस पोस्ट आणि कमेंट यामुळे ट्विटरने ही कारवाई केलेली आहे. कंगनाने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आमदार दिनेश चौधरी यांचे ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये कंगनाने असे लिहिले आहे की, इरफान पठाण यांचे इतर देशाबद्दल इतके प्रेम आहे. पण ते बंगालच्या मुद्द्यावर स्वत: च्या देशात चालू असलेल्या गोष्टीबद्दल ट्विट करू शकले नाहीत.
आता यावर उत्तर देताना इरफान पठाण यांनी म्हटले आहे की, ‘माझे सर्व ट्वीट माणुसकीसाठी किंवा देशवासियांसाठी आहेत. ज्याने उच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले त्या माणसाची दृष्टी त्यातून दिसत आहे. दुसरीकडे कंगनाचे खाते द्वेष पसरवल्यामुळे निलंबित केले गेले होते. आणि मुख्य म्हणजे पैसे घेऊन सामाजिक द्वेष पसरवण्याचे त्यांचे काम आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूविरूद्ध जगभर लढाई सुरू असतानाच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अजून एक छोटेखानी हिंसक युद्ध चालू आहे. भारतासह अनेक देशांनी या दोन्ही देशांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित खेळ आता युद्धाचे रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
संपादन : विनोद सूर्यवंशी
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.