Bihar Politics: आरजेडी प्रमुख लालू यादव यांनी मोठा राजकीय डाव खेळत आरजेडीचे दिग्गज नेते आणि औरंगाबादचे खासदार अभय कुमार कुशवाह यांची लोकसभेतील आरजेडी संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. लालू यादव यांच्या या राजकीय खेळीमुळे बिहारच्या आणि दिल्लीच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कुशवाह याची खासदार म्हणून ही पहिली टर्म आहे. त्यांनी यापूर्वी जेडीयूचे आमदार आणि युवा जेडीयूचे प्रदेशाध्यक्षा पदावर काम केले आहे.
तर दुसरीकडे जेहानाबादचे खासदार डॉ. सुरेंद्र प्रसाद यादव यांची लोकसभेचे मुख्य सचेतक म्हणून निवड करण्यात आली आहे. जेहानाबादमधून ते दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. याच बरोबर डॉ फैयाज अहमद यांना राज्यसभेत व्हिप करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत आरजेडीकडून कुशवाह समाजातील 7 लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे आता संसदीय पक्षनेतेपदासाठी अभय कुशवाह यांची निवड हा राजदचा पाया वाढवण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
आरजेडीचे अभय कुशवाह यांच्याशिवाय सीपीआय (एमएल) चे राजाराम सिंह विजयी झाले. दुसरीकडे एनडीएचे मोठे नेते उपेंद्र कुशवाह यांचा निवडणुकीत पराभव झाला. राजदने लोकसभेत केलेला हा प्रयोग यशस्वी मानला गेला.
आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न म्हणून अभय कुशवाह यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे. राजद खासदार डॉ. मीसा भारती याही लोकसभेच्या पहिल्या कार्यकाळात आहेत.
बक्सरचे आरजेडीचे खासदार सुधाकर सिंह देखील लोकसभेत आपला पहिला टर्म करत आहेत. ते आमदार आणि मंत्री राहिले आहेत.