Ladki Bahin Yojana । केंद्र आणि राज्य सरकार सतत खास महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवत असते. ज्याचा फायदादेखील या महिलांना होत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.
पण ही योजना अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. कारण नुकतेच लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरुन अर्थ विभागाच्याच जीवाला घोर लागला असल्याचे वृत्त व्हायरल झाले आहे. मुली आणि महिलांसाठी अगोदरच राज्यात योजना सुरु असताना ही योजना कशाला, अशी चिंता राज्याच्या वित्त आणि नियोजन विभागाला आली आहे.
एकीकडे ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी महिलांची कागदपत्रांसाठी धावपळ उडली असताना या वृत्तामुळे गोंधळ उडाला होता. तर आता दुसरीकडे याचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने खरपूस समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली असूनवित्त आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा आपण राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अगोदरच निधीची तरतूद?
विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली असल्याने या योजनेसाठी पैसा कुठून आणायचा? हा प्रश्नच निर्माण होत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.