Ladakh Lok Sabha Election : भाजपने मंगळवारी लडाख लोकसभा मतदारसंघासाठी (Ladakh Lok Sabha Election) आपला उमेदवार जाहीर केला. यावेळी भाजपनेला लडाखसाठी ताशी ग्यालसन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लडाखचे विद्यमान खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. जम्मूमधील दोन जागांसह भाजपने लडाखमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत भाजपने काश्मीरमधील तीन जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
अॅड. ताशी ग्यालसन सध्या लडाख हिल ऑटोनॉमस डेव्हलपमेंट कौन्सिल लेहचे अध्यक्ष आहेत. यावेळी ते या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते आणि अखेर भाजपने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित एका महत्त्वाच्या बैठकीत मतदानाद्वारे तीन उमेदवारांचे पॅनल निश्चित करण्यात आले होते. यामध्ये विद्यमान खासदार नामग्याल, ताशी ग्यालसन आणि नगरसेवक स्टॅजिन लाकपा यांच्या नावांचा समावेश होता. यापैकी ताशी ग्यालसन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार नामग्याल यांच्या घटत्या लोकप्रियतेमुळे पक्षाने हा निर्णय घेतला आहे.
Ladakh Lok Sabha
1967 पासून झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सहा वेळा नॅशनल कॉन्फरन्सने दोनदा आणि अपक्षांनी तीन वेळा तसेच भाजपने फक्त दोन वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. 2014 पासून येथे भाजप विजयी होत आहे तर 1996 मध्ये काँग्रेसने येथे शेवटचा विजय मिळवला होता. 1998 आणि 1999 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सने विजय मिळवला होता परंतु त्यानंतरच्या 2004 आणि 2009 च्या दोन निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते.
सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही नॅशनल कॉन्फरन्सने ही जागा काँग्रेससाठी सोडली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स एकत्र निवडणूक लढवत आहेत. जम्मू आणि लडाख काँग्रेसला आणि काश्मीरमधील तीन जागा नॅशनल कॉन्फरन्स ला देण्यात आल्या आहेत. लडाख मतदार संघासाठी पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे.
Ladakh Lok Sabha
सन 2019 मध्ये लडाखला जम्मू-काश्मीर पासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्यात आले होते. लद्दाखमध्ये कारगिल आणि लेह असे दोन जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक लडाख स्वायत्त विकास परिषद आहे. यापैकी एलएएचडीसी लेह भाजपकडे आणि एलएएचडीसी कारगिल नॅशनल कॉन्फरन्सकडे आहे.
दरम्यान भाजपने विद्यमान खासदार नामग्याल यांचे तिकीट कट केले आहे. नामग्याल यांनी कलम 370 आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकावर संसदेत दमदार भाषण केले होते. त्यांच्या भाषणाने गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांसारख्या भाजप नेत्यांना प्रभावित केले होते. इतकेच नव्हे तर भाषणा नंतर भाजप मंत्री आणि खासदारांनी सभागृहात नामग्याल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी टेबलही वाजवले होते. मात्र आता त्यांचे तिकीट भाजपने कट केले आहे भाजपने या ठिकाणी धक्कातंत्र वापरले आहे.