मराठा आरक्षण : आघाडी व भाजप सरकारची ‘ती’ चूक नडली; पहा नेमके काय भोवले मराठा समाजाला..!
कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्याने सध्या सामाजिक भावना संतप्त आहे. त्यामुळेच यावर तातडीने तोडगा काढून समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. त्यात बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन आघाडी आणि नंतरच्या भाजप सरकारने केलेल्या चुकीवर बोट ठेऊन अशी चूक नडल्याची जाहीर कबुली दिली आहे.
मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात मिळाले. त्यावेळी आघाडी सरकारनेच ते दिले. वेळी नारायण राणे समिती नेमून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली. ती म्हणजे आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण देण्याची घाई केली. पुढे मुख्यमंत्री असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही तीच चूक केली. परिणामी हायकोर्टाने आरक्षण नाकारले. त्यामुळे भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करु नका. कायदा नीट केला असता तर आरक्षण टिकले असते. त्यामुळे आमच्यासह भाजपची ही चूक आहे.
आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदतीचे आवाहन मुश्रीफ यांनी केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कालच यावर चर्चा केली. त्यांनी चर्चेसाठी कधीही तयार असल्याचे म्हटलेले आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.