कोल्हापूर : कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकार जीएसटी संकलनाद्वारे भरघोस कमाई करत आहे. दर महिन्यास रेकॉर्ड ब्रेक जीएसटी वसुली होत आहे. मात्र, दुसरीकडे केंद्राने राज्यांना जीएसटी थकबाकीचे पैसे दिले नसल्याने राज्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याच मुद्द्यावर राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. जीएसटीच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, की ‘चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्दैवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती माहीत नाही. आजमितीस केंद्राकडे जीएसटीचे 24 हजार कोटी रुपये थकले आहेत. पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात सुद्धा याचा उल्लेख केला आहे. काही जणांना मात्र हे माहीत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हंटले जाते, तशी अवस्था काही लोकांची झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले. ‘कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त आहे, त्यामुळे येथे कोणत्याही परिस्थितीत निर्बंध कमी केले जाणार नाहीत, उलट निर्बंध अधिक कठोर केले जातील,’ असा इशारा त्यांनी दिला. नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत नाहीत, बरेच जण मास्क वापरत नाहीत. असे, करू नका, नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे, या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले, की ‘नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षवाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची किंवा स्वबळावर लढायचे, याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही काही मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही.’
दरम्यान, राज्यात सध्या कोरोना आटोक्यात येत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. येथे रुग्ण वेगाने वाढत आहे, तसेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त आहे, त्यामुळे येथे निर्बंध कायम आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर निर्बंध अधिक कठोर करण्याचाही राज्य सरकारचा विचार आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.