मुंबई : एकदिवसीय कर्णधार म्हणून केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय मालिका 0-3 ने गमावली होती. एक फलंदाज म्हणून त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 55 रन केले होते मात्र पहिल्या सामन्यात त्याने फक्त 12 रन केले तर तिसऱ्या सामन्यात फक्त 9 रन केले. केएल राहुलने तिसऱ्या सामन्यात 9 रन करत विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आणि पहिल्या क्रमांकावर आला आहे.
भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्या 40 डावांमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम त्याच्या केएल राहुलच्या नावावर आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होते. केएल राहुलने पहिल्या 40 एकदिवसीय डावात 1585 रन केले आहेत तर विराट कोहलीने इतक्या डावात 1583 रन केले आहेत. आता कोहलीला मागे टाकत राहुल पहिल्या क्रमांकावर आला आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघास कसोटी आणि एकदिवसीय पराभव स्वीकारावा लागला. या दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा नव्हता. आता वेस्ट इंडिजचा संघ देशात येत आहे. येथे दोन्ही संघां दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या क्रिकेट मालिकेत रोहित शर्मा संघात असेल, असे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत संघाबाहेर कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना बाहेर बसावे लागू शकते.
आता रोहित शर्मा परतणार असल्याने संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे असेल. राहुलवरील जबाबदारी कमी होणार आहे. कर्णधारपदाचे दडपण कमी झाल्याने आता त्याच्या कामगिरीत सुधारणा होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
… म्हणून ‘या’ माजी क्रिकेटपटूने विराटला चांगलेच सुनावले; जाणून घ्या, कोणत्या वादाचे ठरतेय कारण ?