Harry Brook First Century in IPL : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयपीएल 2023 (IPL) च्या 19 व्या सामन्यात या हंगामातील पहिले शतक पहायला मिळाले. हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रुकने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध फलंदाजी करताना आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. हे शतक चार डावांनंतर आले. ब्रूकने 55 चेंडूत शतक पूर्ण केले.
हॅरी ब्रूकने पहिल्या तीन सामन्यात 13 चेंडूत 21 धावा, दुसऱ्या सामन्यात 3 चेंडूत 4 धावा आणि तिसऱ्या सामन्यात 13 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांत ब्रूक शांत दिसला. चौथ्या सामन्यात हॅरी ब्रूकने कोलकात्याच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. हॅरी ब्रूकने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 3 अप्रतिम षटकार मारले.
वेगवान गोलंदाज किंवा फिरकी गोलंदाज दोघेही काही करू शकले नाहीत. सलामीला आलेल्या हॅरी ब्रूकने नाबाद राहताना 55 चेंडूत 100 धावा केल्या. याआधी हॅरीने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 254.84 होता. हॅरी ब्रूक घरच्या मैदानाबाहेर शतक करणारा सनरायझर्सचा पहिला फलंदाज ठरला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादसाठी शतक करणारा तो तिसरा फलंदाज आहे. हॅरी ब्रूक, डेव्हिड वॉर्नरच्या आधी जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादसाठी हे चमत्कार केले आहेत.
आजच्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने धडाकेबाज सुरुवात केली. मयंक अग्रवालने पुन्हा एकदा निराश केले. सलामीवीर हॅरी ब्रूकने वेगवान फलंदाजी करत मयंक अग्रवाल (09 धावा) सोबत पहिल्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या. रसेलने प्रथमच गोलंदाजी करत प्रथम मयंक अग्रवाल आणि नंतर राहुल त्रिपाठी (09) यांना बाद केले.
हॅरी ब्रूकसोबत कर्णधार एडन मार्करामही सामील झाला होता. दोघांनी वेगवान खेळ करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. मार्कराम 50 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने 17 चेंडूत 32 धावांची जलद खेळी केली. त्याचवेळी, हेन्री क्लासेन 6 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला.