Karnataka : कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर गदारोळ सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाचे दुसरे मजबूत उमेदवार असलेले काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) काल दिल्लीत पोहोचले आहेत. तर शिवकुमार पोटाच्या संसर्गामुळे बेंगळुरूमध्ये परतले होते. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना मुख्यमंत्री निवडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षकांच्या अहवालानंतर आता सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. 18 किंवा 20 मे रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. कर्नाटक विधानसभेत 224 जागा आहेत. सत्ता मिळवण्यासाठी केवळ 113 जागांची गरज आहे. कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला बहुमतापेक्षा 12 जागा जास्त मिळाल्या आहेत. अशी चर्चा आहे की सिद्धरामय्या यांनी पहिली दोन वर्षे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे आणि नंतर डीके शिवकुमार.
मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डीके शिवकुमार यांनी सांगितले की, ते पक्षाच्या नेतृत्वाला भेटणार आहेत. आणि मी माझा शब्द पाळीन. मी पक्षाचा भाग आहे.
डीके शिवकुमार म्हणाले की, माझे 135 आमदार आहेत आणि माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 135 आमदारांनी आपले मत मांडले आहे. आणि एका ओळीचा ठराव मंजूर केला. काहींनी वैयक्तिक मतही व्यक्त केले आहे.
सिद्धरामय्या सोमवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. सिद्धरामय्या यांचा दावा आहे की बहुतांश आमदारांना तेच मुख्यमंत्रीपदी हवे आहेत. डीके शिवकुमार यांच्याशीही माझे चांगले संबंध असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगतिले.
या दोन नेत्यांच्या दावेदारीमुळे मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आधिक वाढला आहे. तरी देखील आज मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.