Karnataka Polls : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Polls) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) यापूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, तर दुसरी यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे.
जगदीश शेट्टर यांनी नड्डा यांची भेट घेतली
भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले नाही. यात जगदीश शेट्टार यांचेही नाव नाही. त्यामुळे शेट्टार प्रचंड नाराज झाले आहेत. मात्र, त्यांनी बुधवारी राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जेपी नड्डा यांच्याकडे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
जगदीश शेट्टार निवडणूक लढणार ?
भाजप अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर जगदीश शेट्टार यांनी पत्रकारांना सांगितले की, मी निवडणूक लढणार असल्याचे जेपी नड्डा यांना कळवले आहे. गेल्या 6 निवडणुका मी जिंकल्या आहेत. याबाबत इतर नेत्यांशी चर्चा करू आणि काहीतरी निर्णय नक्कीच घेऊ, असे शेट्टार म्हणाले. याआधी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांचे जगदीश शेट्टार यांच्याबाबतचे वक्तव्य समोर आले होते. ९९ टक्के जगदीश शेट्टार यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, असे ते म्हणाले होते.
विशेष म्हणजे भाजपने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या दरम्यान पक्षाने 52 नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ज्यामध्ये 9 डॉक्टर, 5 वकील आणि एक IAS-IPS अधिकारी यांचा समावेश आहे.
अनेकांचा हिरमोड
भाजपने अनेक नेत्यांना तिकीट दिले नाही. ज्या कारणामुळे ते प्रचंड संतापल्याचे बोलले जात आहे. यामध्ये जगदीश शेट्टार यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी नाराज होत राजीनामा दिला आहे.